महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी महत्त्वाचा व कडक निर्णय घेतला आहे. परीक्षांमध्ये कॉपी व गैरप्रकार पूर्णपणे थांबवण्यासाठी लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षांच्या प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत.

विशेषतः लेखी परीक्षेपूर्वी होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये आता बाह्य परीक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे. खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षकांना अनुदानित शाळांमध्ये, तर अनुदानित शाळांमधील शिक्षकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये बाह्य परीक्षक म्हणून नियुक्त केले जाणार आहे.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार असून, १० फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा २ ते १८ फेब्रुवारी दरम्यान पार पडतील आणि २० फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होईल.
दरम्यान, परीक्षेदरम्यान कॉपी केसेस किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याचा कठोर निर्णय बोर्डाने घेतला आहे.
याशिवाय परीक्षा केंद्रांसाठी पक्के वॉल कंपाउंड, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या केंद्रांचे वॉल कंपाउंड खराब आहे, त्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रात्यक्षिक परीक्षेपूर्वी ७ जानेवारी रोजी बाह्य परीक्षकांचा उद्बोधन वर्ग घेण्यात येणार असून, त्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान कोणत्या बाबी तपासायच्या, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिक परीक्षांच्या काळात प्रत्येक जिल्ह्यातील किमान १० टक्के शाळांना शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची पथके भेट देऊन तपासणी करणार आहेत.
लेखी परीक्षेतही मोठे बदल
पूर्वी विद्यार्थ्यांची सरमिसळ करूनही अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार आढळले होते. त्यामुळे यंदा प्रथमच पर्यवेक्षकांमध्येही सरमिसळ करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असतील. तसेच परीक्षेच्या वेळेत पर्यवेक्षकांचे मोबाईल कॅमेरे झूमद्वारे थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जोडले जाणार आहेत, ज्यामुळे परीक्षेदरम्यान होणारी प्रत्येक हालचाल थेट नियंत्रणाखाली राहणार आहे.
या सर्व उपाययोजनांमुळे दहावी–बारावीच्या परीक्षांतील गैरप्रकार पूर्णपणे थांबतील, असा विश्वास बोर्डाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Comments are closed.