महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी शाखांतील पदवी अभ्यासक्रमांसाठीची एमएचटी-सीईटी परीक्षा तसेच एमबीए प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा आता दरवर्षी दोनदा एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांमधील जास्त गुण मिळालेल्या प्रयत्नाचे गुणच प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील.
राष्ट्रीय स्तरावरील जेईई परीक्षेच्या धर्तीवर हा बदल करण्यात आला आहे. सीईटी सेलकडून जाहीर केल्याप्रमाणे, पीसीएम, पीसीबी गटाची तसेच एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहे. इतर अभ्यासक्रमांसाठी मात्र सध्या ही पद्धत लागू केली जाणार नाही.
या महत्त्वपूर्ण निर्णयाचा प्रारूप आराखडा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर झाला. या बैठकीला अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी सेल आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते.
सीईटी सेलने कळवले आहे की पहिली परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये, तर दुसरी मे २०२६ मध्ये घेण्यात येईल. दोन्ही वेळच्या सीईटीबाबतचे सविस्तर वेळापत्रक आणि माहिती सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे दुहेरी संधी आणि अधिक गुणांची हमी!

Comments are closed.