राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) कडून २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणीला येत्या आठवडाभरात सुरुवात होणार आहे. यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर तांत्रिक चाचण्या सुरू असून त्या पूर्ण होताच ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती सीईटी सेलमधील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यंदा बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांसाठी पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटी, कृषी अभ्यासक्रमासाठी पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी, तसेच एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा यंदा दोन वेळा घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होणार असून प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचा सीईटी सेलचा प्रयत्न आहे.
सीईटी सेलमार्फत २४ मार्चपासून प्रवेश परीक्षांना सुरुवात होणार असून सध्या एकूण १७ प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या १२ परीक्षा आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ५ परीक्षा असतील. बहुतांश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सकाळी व दुपारच्या सत्रात घेतल्या जातील, तर काही परीक्षा सायंकाळच्या सत्रातही होणार आहेत.
असे आहे संभाव्य वेळापत्रक
- MBA / MMS CET ची पहिली परीक्षा ६ एप्रिल ते ८ एप्रिल, तर दुसरी परीक्षा ९ मे २०२६ रोजी घेतली जाणार आहे.
- इंजिनिअरिंग व फार्मसीसाठी PCM Group MHT-CET ची पहिली परीक्षा ११ एप्रिल ते १९ एप्रिल, तर दुसरी परीक्षा १४ मे ते १७ मे दरम्यान होईल.
- त्याचप्रमाणे, कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या PCB Group MHT-CET ची पहिली परीक्षा २१ एप्रिल ते २६ एप्रिल, तर दुसरी परीक्षा १० व ११ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
त्यामुळे सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी सज्ज राहावे आणि अधिकृत संकेतस्थळावर येणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.