शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या नोंदणीला State Common Entrance Test Cell Maharashtra कडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) तसेच कृषी शिक्षण अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे.
एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी) परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६ होती. आता विलंब शुल्कासह २५ ते २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत १७ अभ्यासक्रमांसाठी सुमारे १२.२८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दोन संधी मिळून ही संख्या १६.५८ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
यंदापासून विद्यार्थ्यांची माहिती अधिक अचूक राहावी यासाठी सीईटी नोंदणीदरम्यान अपार (APAAR) आयडी व दिव्यांग उमेदवारांसाठी यूडीआयडी विचारण्यात येणार आहे. मात्र हे आयडी बंधनकारक नसून, पडताळणीसाठी वापरण्यात येणार आहेत. अपार आयडी नसलेल्या विद्यार्थ्यांनी डिजिलॉकरद्वारे तो तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बी.एस्सी नर्सिंग तसेच डीपीएन व पीएचएन (वैद्यकीय) अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणीस १६ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बी.डिझाइन, बी.एड, एम.एड व एमपी.एड या अभ्यासक्रमांसाठी नोंदणीची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी २०२६ आहे. संपूर्ण वेळापत्रक व माहिती पुस्तिका अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून सीईटी परीक्षा राज्यभरातील केंद्रांवर संगणकाधारित ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.

Comments are closed.