सीईटी प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा गोंधळ, नोंदणीतील तांत्रिक अडचणी आणि केंद्रीभूत प्रवेशातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार धुळे, अकोला, नांदेड आणि वर्धा येथे विभागीय स्तरावर सुसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हे उपक्रम २२ जानेवारीपर्यंत राबवले जाणार आहेत.
दरवर्षी १३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी सीईटीच्या विविध परीक्षांना सामोरे जात असताना, यंदा केवळ ऑनलाइन माहितीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष संवादातून मार्गदर्शन देण्यावर भर देण्यात आला आहे. या कार्यक्रमांत सीईटी कक्षातील तज्ज्ञ अधिकारी विद्यार्थी व पालकांशी थेट संवाद साधून प्रवेश परीक्षा, नोंदणी प्रक्रिया, अभ्यासक्रम निवड आणि केंद्रीभूत प्रवेशाबाबत सविस्तर माहिती देणार आहेत.
तंत्रशिक्षण, वैद्यकीय व आयुष, कृषी, उच्च शिक्षण तसेच ललित कला शिक्षण या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शंकांना जागेवरच उत्तरे दिली जाणार असून, सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुसंवाद कार्यक्रमांसाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

Comments are closed.