केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) प्रशासकीय कारणांमुळे 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या काही विषयांच्या परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. याबाबतचे सुधारित वेळापत्रक मंडळाने जाहीर केले असून, संबंधित बदल अॅडमिट कार्डमध्येही दर्शवले जातील, तसेच शाळांनी अंतर्गत परीक्षा वेळापत्रक अद्ययावत करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

इयत्ता 10वी साठी प्रादेशिक व परदेशी भाषा (Group-L) — तिबेटी, भोटी, भुटिया, बोडो, तांगखुल, मिझो, काश्मीरी, तसेच जर्मन, जपानी, स्पॅनिश, बहासा मेलायू — आणि अकॅडमिक इलेक्टिव्हज (Group-A2) मधील NCC व बुक कीपिंग व अकाउंटन्सीचे मूलतत्त्वे हे पेपर आता 11 मार्च 2026 रोजी घेतले जातील. तर इयत्ता 12वीचा ‘लीगल स्टडीज’ विषयाचा पेपर, जो आधी 3 मार्चला होता, तो आता 10 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. उर्वरित सर्व परीक्षा तारखा जशाच्या तशा राहतील.
29 डिसेंबर 2025 रोजीच्या परिपत्रकात परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी शाळा प्रमुखांना कळवले की, “3 मार्च 2026 रोजी नियोजित असलेल्या काही विषयांच्या परीक्षा प्रशासकीय कारणांमुळे पुनर्नियोजित करण्यात आल्या आहेत.” शाळांनी ही माहिती विद्यार्थी व पालकांपर्यंत तातडीने पोहोचवावी आणि सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरळीत करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, CBSE बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, पहिल्या दिवशी इयत्ता 10वीसाठी गणित (स्टँडर्ड/बेसिक) तर इयत्ता 12वीसाठी बायोटेक्नॉलॉजी, एंटरप्रेन्युअरशिप, शॉर्टहँड (इंग्रजी/हिंदी) विषय असतील. दोन्ही वर्गांचे पेपर सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या एकाच सत्रात घेतले जातील. विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रक तपासून तयारीचे नियोजन करण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.