यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षेत विचारलेल्या ‘उच्च जातीचे नाव काय?’ या अयोग्य प्रश्नामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रश्नावलीत असा प्रश्न पाहताच शिक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि शिक्षण विभागाच्या व्हॉट्सअॅप गटावर निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘टार्गेट पीक अॅप’ उपक्रमांतर्गत ही सराव परीक्षा घेण्यात आली होती. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्तीत मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण व्हावेत म्हणून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे विशेष मार्गदर्शन सुरू आहे. विद्यार्थ्यांना या अॅपद्वारे व्हिडीओ लेक्चर्स आणि प्रॅक्टिस टेस्ट उपलब्ध करून दिल्या जातात.
६ डिसेंबर रोजी झालेल्या या सराव परीक्षेत प्रश्नावली तयार करण्याचे काम एका बाह्य संस्थेकडे देण्यात आले होते. मात्र, त्यांनीच असा संवेदनशील आणि सामाजिक दृष्ट्या निषेधार्ह प्रश्न समाविष्ट केल्याने खळबळ उडाली. हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवला असून, खुलासा आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकूणच, अयोग्य प्रश्नामुळे निर्माण झालेल्या या गोंधळामुळे शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी परीक्षांमध्ये अधिक काटेकोरपणे प्रश्नावली तयार करण्याची मागणी होत आहे.

Comments are closed.