यंदाच्या सामायिक प्रवेश परीक्षेत (CET) बनावट उमेदवारांना रोखण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा लागू केली आहे. परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना क्यूआर कोड स्कॅनिंगसोबतच फेशिअल रेकग्निशन प्रक्रियेतून जावे लागणार आहे. याशिवाय परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, तसेच पर्यवेक्षकांच्या अंगावर बॉडी कॅमेरे असतील.
गेल्या वर्षी प्रत्येक परीक्षार्थीच्या प्रवेशपत्रावर क्यूआर कोड असायचा आणि त्याद्वारे खातरजमा केली जायची. यंदाही तीच प्रणाली कायम राहणार आहे. परीक्षेच्या खोल्यांमध्ये बसवलेल्या कॅमेरांमधून सर्व घडामोडींवर सतत देखरेख ठेवली जाणार आहे. याशिवाय, प्रत्येक पर्यवेक्षकाला शरीरावर कॅमेरा लावावा लागणार असून, तो परीक्षेदरम्यान संपूर्ण हालचालींची नोंद ठेवेल.
यंदाच्या परीक्षेत सर्वांत महत्त्वाचे बदल म्हणजे प्रत्येक परीक्षार्थ्याची चेहरा पडताळणी केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांना फेशिअल रेकग्निशन प्रक्रियेतून जावे लागेल. अर्ज भरताना दिलेल्या फोटोशी 80% साम्य आढळल्यासच परीक्षेला बसण्याची परवानगी मिळेल. ही पडताळणी प्रवेश प्रक्रियेदरम्यानही उपयोगात आणली जाईल.
ही यंत्रणा लागू केल्याने परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होईल. भविष्यात आणखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून परीक्षांतील गैरप्रकार टाळण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती CET कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.