आगामी अर्थसंकल्प २०२६ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक घोषणा होण्याची शक्यता आहे. कोविड काळात स्थगित करण्यात आलेली रेल्वे तिकीट सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
रेल्वे आणि वित्त मंत्रालयामध्ये या विषयावर सकारात्मक चर्चा सुरू असून, निर्णय झाल्यास ६० वर्षांवरील पुरुष व ५८ वर्षांवरील महिलांना मोठा फायदा होऊ शकतो.
कोरोना महामारीनंतर, मार्च २०२० पासून रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांची सवलत थांबवली होती. रेल्वेच्या मते, या सवलतीमुळे दरवर्षी १,६०० ते २,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येत होता. मात्र सध्या रेल्वेचे उत्पन्न वाढल्याने आणि सामाजिक दबाव लक्षात घेता, ही सवलत पुन्हा लागू करण्याची मागणी जोर धरत आहे.
कोविडपूर्व काळात ज्येष्ठ नागरिकांना पुरुषांसाठी ४०% आणि महिलांसाठी ५०% सूट दिली जात होती. ही सवलत स्लीपरपासून ते १एसीपर्यंत सर्व वर्गांमध्ये लागू होती. आता मात्र बजेट २०२६ मध्ये ही सुविधा मर्यादित स्वरूपात, म्हणजे स्लीपर व 3AC वर्गापुरती लागू करण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तीर्थयात्रा, उपचार किंवा कुटुंबीयांना भेटण्यासाठी रेल्वेवर अवलंबून असलेल्या अनेक ज्येष्ठांसाठी ही सूट केवळ आर्थिक मदत नसून सन्मानजनक व परवडणाऱ्या प्रवासाचा आधार ठरू शकते. बजेट २०२६ मध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.