देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे संरक्षण करणारे सीमा सुरक्षा दल (BSF) आता क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडूंना कायमस्वरूपी सरकारी नोकरीची मोठी संधी देत आहे. BSF कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) स्पोर्ट्स कोटा भरती २०२५ अंतर्गत एकूण ५४९ पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे पुरेसे आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २७ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार असून १५ जानेवारी २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छुक व पात्र उमेदवार BSF च्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. एकूण ५४९ पदांपैकी २७७ पदे पुरुष खेळाडूंसाठी तर २७२ पदे महिला खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
BSF क्रीडा कोटा भरतीत ३० हून अधिक खेळांचा समावेश असून यामध्ये अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, हॉकी, फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, नेमबाजी, पोहणे, योग आदी प्रमुख खेळांचा समावेश आहे. त्यामुळे विविध खेळांतील खेळाडूंना समान संधी देण्याचा उद्देश या भरतीमागे आहे.
या भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे असून वयाची गणना १८ ऑगस्ट २०२५ पासून केली जाईल. शासन नियमांनुसार एससी/एसटी उमेदवारांना ५ वर्षे आणि ओबीसी (नॉन-क्रिमी लेयर) उमेदवारांना ३ वर्षे वयोसूट दिली जाणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर-३ अंतर्गत दरमहा ₹२१,७०० ते ₹६९,१०० वेतन मिळेल. यासोबतच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता तसेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या नवीन पेन्शन योजनेचे लाभही मिळणार आहेत.
निवड प्रक्रिया ही ऑनलाईन अर्ज व क्रीडा प्रमाणपत्रांची छाननी, कागदपत्र पडताळणी, शारीरिक मानक चाचणी (PST), क्रीडा कामगिरीवर आधारित गुणवत्ता यादी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांत पार पडणार आहे.
अर्ज शुल्काबाबत बोलायचे झाल्यास, सामान्य व ओबीसी पुरुष उमेदवारांसाठी ₹१५९ शुल्क आकारले जाणार असून महिला तसेच एससी/एसटी उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
इच्छुक उमेदवारांनी BSF च्या अधिकृत भरती वेबसाइटला भेट देऊन “Constable (GD) Sports Quota Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करावे. नवीन नोंदणी करून अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक, शैक्षणिक व क्रीडा माहिती भरावी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा व भविष्यासाठी अर्जाची प्रिंटआउट जपून ठेवावी.

Comments are closed.