Agniveer BSF भरती संदर्भात केंद्र सरकारने माजी अग्निवीरांसाठी अत्यंत दिलासादायक व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दल (BSF) मधील काँस्टेबल भरती नियमांमध्ये बदल करत, माजी अग्निवीरांसाठी थेट 50 टक्के आरक्षण तसेच वयोमर्यादेत विशेष सवलत जाहीर केली आहे. या निर्णयासंदर्भातील सुधारित अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र उमेदवार ही माहिती अधिकृत वेबसाईटवर तपासू शकतात.

नवीन अधिसूचनेनुसार, BSF मध्ये थेट भरतीद्वारे होणाऱ्या प्रत्येक काँस्टेबल भरती वर्षात एकूण 50 टक्के जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असतील. यासोबतच 10 टक्के जागा माजी सैनिकांसाठी आणि 3 टक्के जागा कॉम्बॅटाइज्ड काँस्टेबल (ट्रेड्समन) समायोजनासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. हा निर्णय अग्निपथ योजनेअंतर्गत सेवा पूर्ण केलेल्या जवानांना केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दलांमध्ये करिअरची मजबूत संधी देणारा ठरणार आहे.
वयोमर्यादेत मोठी सवलत – अग्निवीरांसाठी सुवर्णसंधी
अग्निवीरांसाठी सुवर्णसंधी अशी ही भरती प्रक्रिया माजी अग्निवीरांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. BSF काँस्टेबल (GD) पदासाठी सामान्यतः किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 23 वर्षे निश्चित करण्यात आले असून, वयोमर्यादेची गणना संबंधित SSC किंवा नोडल फोर्सच्या अधिसूचनेनुसार केली जाणार आहे.
मात्र, माजी अग्निवीरांसाठी केंद्र सरकारने विशेष सवलत जाहीर केली असून, पहिल्या बॅचच्या माजी अग्निवीरांना कमाल 5 वर्षांची तर इतर माजी अग्निवीरांना 3 वर्षांपर्यंत वयोमर्यादा सूट दिली जाणार आहे. या विशेष सवलतीमुळे मोठ्या संख्येने माजी अग्निवीरांना BSF मध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
अग्निवीर म्हणजे कोण?
अग्निवीर हे केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत भरती होणारे जवान असतात. ही योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली असून, भारतीय सशस्त्र दल अधिक तरुण, सक्षम आणि आधुनिक बनवणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना भारतीय सेना, नौदल आणि वायुदलात 4 वर्षांच्या अल्पकालीन सेवेसाठी भरती केले जाते आणि या सेवाकालात त्यांना ‘अग्निवीर’ असे संबोधले जाते.
सेवा कालावधी, वेतन आणि पुढील भवितव्य
अग्निपथ योजनेनुसार, 4 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर 25 टक्के अग्निवीरांना कायम सेवेत (रेग्युलर) सामावून घेतले जाते, तर उर्वरित 75 टक्के अग्निवीरांना सन्मानपूर्वक सेवा निवृत्ती दिली जाते.
अग्निवीरांना मिळणारे मासिक वेतन पुढीलप्रमाणे आहे –
- पहिलं वर्ष: ₹30,000
- दुसरं वर्ष: ₹33,000
- तिसरं वर्ष: ₹36,500
- चौथं वर्ष: ₹40,000
पात्रता निकष व सेवा पश्चात संधी
साधारणतः 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुण या योजनेत सहभागी होऊ शकतात. पदानुसार 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, शारीरिक व वैद्यकीय चाचणी अनिवार्य आहे. 4 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना BSF, CRPF, CISF तसेच इतर CAPF भरतीत आरक्षण, राज्य पोलीस भरतीत प्राधान्य तसेच खासगी क्षेत्रात रोजगारासाठी विशेष सहाय्य दिले जाते.
हा निर्णय माजी अग्निवीरांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि स्थिर करिअरचा मार्ग खुला करणारा ठरणार आहे.

Comments are closed.