मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत मुंबई मुख्यालयासह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठासाठी एकूण २,३३१ रिक्त पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया दोन वर्षांच्या कालावधीसाठी राबवली जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ही भरती शिपाई/हमाल/फराश, वाहन चालक, लिपिक तसेच स्टेनोग्राफर (कनिष्ठ व वरिष्ठ श्रेणी) अशा विविध पदांसाठी होणार आहे. अर्ज प्रक्रिया १५ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार असून, ०५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
पदनिहाय जागांचा तपशील
या भरती अंतर्गत शिपाई/हमाल/फराश – ८८७, वाहन चालक – ३७, लिपिक – १,३३२, स्टेनोग्राफर (कनिष्ठ श्रेणी) – ५६ आणि स्टेनोग्राफर (वरिष्ठ श्रेणी) – १९ अशी पदे उपलब्ध असून, एकूण २,३३१ जागा भरल्या जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण व वेतन
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती मुंबई, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे केली जाईल. पदानुसार ₹१६,६०० ते ₹१,७७,५०० पर्यंत वेतन देण्यात येणार असून, शासन नियमांनुसार इतर भत्तेही लागू असतील.
शैक्षणिक पात्रता
शिपाई/हमाल पदांसाठी किमान ७ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वाहन चालक पदासाठी वैध LMV ड्रायव्हिंग लायसन्स, किमान ३ वर्षांचा अनुभव, वाहन देखभालीचे ज्ञान व शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे.
लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक असून इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रतिमिनिट बंधनकारक आहे; कायद्याची पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल.
स्टेनोग्राफर (कनिष्ठ) पदासाठी पदवीसह इंग्रजी शॉर्टहँड ८० wpm व टायपिंग ४० wpm, तर स्टेनोग्राफर (वरिष्ठ) पदासाठी किमान ५ वर्षांचा अनुभव, शॉर्टहँड १०० wpm व टायपिंग ४० wpm आवश्यक आहे.
वयोमर्यादा
लिपिक व शिपाई पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षे, तर राखीव प्रवर्गासाठी १८ ते ४३ वर्षे असावे.
स्टेनोग्राफर व वाहन चालक पदांसाठी खुल्या प्रवर्गातील वय २१ ते ३८ वर्षे, तर राखीव प्रवर्गासाठी २१ ते ४३ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. शासकीय व उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना नियमानुसार सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क व निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांना ₹१,०००/- परीक्षा शुल्क भरावे लागेल. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व आवश्यकतेनुसार कौशल्य/व्यक्तिमत्त्व चाचणी यांद्वारे राबवली जाईल.
अर्ज कसा कराल?
पात्र उमेदवारांनी https://bombayhighcourt.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.