बोर्ड परीक्षांतील कर्मचाऱ्यांना दिलासा!-Board Exam Honorarium to Increase!

Board Exam Honorarium to Increase!

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांदरम्यान परीक्षा केंद्रांवर कार्यरत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय होण्याचे संकेत मिळाले आहेत. परीक्षा संचालनासाठी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मानधनात सुमारे १५ टक्के वाढ करण्यास मान्यता मिळण्याची शक्यता असून, मागील वर्षी करण्यात आलेली केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदल यंदा रद्द राहण्याचीही शक्यता आहे.

Board Exam Honorarium to Increase!राज्य परीक्षा मंडळाच्या शालांत परीक्षांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक तसेच इतर कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या भत्त्यात वाढ व्हावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. मागील वर्षी उत्तरपत्रिका तपासणी करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्यानंतर आता प्रत्यक्ष परीक्षा कामकाज करणाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यावर भर देण्यात आला आहे.

या संदर्भात शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुळकर्णी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत परीक्षा संचालन मानधनात १५ टक्के वाढ करण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. तसेच परीक्षा केंद्रांवरील पाणी व्यवस्थेसाठी १०० विद्यार्थ्यांमागे एक व्यक्ती देण्याचा निर्णयही चर्चेत आला.

याशिवाय, सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे परीक्षा केंद्र बंद करू नये, अशी मागणी मान्य करण्यात आली. मागील वर्षी करण्यात आलेली शिक्षकांची अदलाबदल यंदा लागू न करण्यावरही सहमती दर्शवण्यात आली, ज्यामुळे विशेषतः ग्रामीण व महिला शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments are closed.