मुंबई महापालिकेच्या CBSE, ICSE, IB आणि IGCSE माध्यमांच्या शाळांना यंदा प्रवेशासाठी विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. पालिकेच्या एकूण 22 शाळांतील नर्सरी प्रवेशासाठी 1 जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होती.
26 जानेवारी रोजी ही प्रक्रिया संपल्यानंतर, उपलब्ध 1,514 जागांसाठी तब्बल 2,407 अर्ज दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवेश लॉटरी पद्धतीने दिले जाणार आहेत.
प्रवेश अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून, 30 जानेवारी रोजी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. आकडेवारीनुसार, ज्युनियर केजीच्या 272 जागांसाठी 643 अर्ज, सीनियर केजीच्या 272 जागांसाठी 575 अर्ज, तर पहिलीच्या 238 जागांसाठी 422 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये 5 टक्के जागा महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आणि 10 टक्के जागा महापौर शिफारशीसाठी राखीव आहेत.
खासगी शाळांचे वाढते शुल्क सर्वसामान्य पालकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने, कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या पालिका शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. 2020 मध्ये जोगेश्वरी (पूर्व) येथील पूनमनगरमध्ये पहिली CBSE शाळा सुरू झाल्यानंतर पालिकेला मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 2021 मध्ये आणखी दहा ठिकाणी CBSE शाळा सुरू करण्यात आल्या, तसेच ICSE, IB आणि IGCSE मंडळांच्या प्रत्येकी एक शाळाही कार्यान्वित करण्यात आली.
या शाळांमध्ये बालवाडी व लहान गटांच्या तुकड्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. खासगी आंतरराष्ट्रीय शाळांचा खर्च परवडत नसलेल्या गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी पालिकेच्या या शाळा शिक्षणाची मोठी संधी ठरत असून, त्यामुळे दरवर्षी प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत.

Comments are closed.