ब्लू-कॉलर कर्मचाऱ्यांची चलती! पगारवाढीत ‘व्हाइट-कॉलर’ मागे! | Blue-collar leads, white-collar lags!

Blue-collar leads, white-collar lags!

भारतातील कामगार बाजारपेठेत सध्या मोठा बदल पाहायला मिळत असून, पारंपरिक समजुतींना छेद देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. आघाडीच्या भरती मंच WorkIndia च्या ताज्या अहवालानुसार, शारीरिक श्रम करणाऱ्या ‘ब्लू-कॉलर’ कामगारांच्या वेतनवाढीचा वेग हा कार्यालयीन ‘व्हाइट-कॉलर’ कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वी उच्च शिक्षण आणि बौद्धिक कौशल्य असलेल्या नोकऱ्यांनाच जास्त वेतन मिळते, अशी धारणा होती; मात्र सध्याच्या घडीला बाजारातील मागणी आणि कुशल कामगारांची कमतरता यामुळे चित्र पूर्णपणे बदलताना दिसत आहे.

Blue-collar leads, white-collar lags!

अहवालानुसार, ब्लू-कॉलर कामगारांच्या किमान वेतनात सरासरी ८.६० टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२४ मध्ये सुमारे १४,०५६ रुपये असलेले सरासरी वेतन २०२५ मध्ये १५,२६५ रुपयांवर पोहोचले आहे. याउलट, सुरुवातीच्या स्तरावरील व्हाइट-कॉलर नोकऱ्यांमध्ये वेतनवाढ फक्त ६.७५ टक्क्यांच्या दराने झाली असून, १४,७६० रुपयांवरून ते १५,७५६ रुपयांपर्यंतच वाढले आहे. यावरून श्रमाधारित नोकऱ्यांमध्ये वेतनवाढीचा वेग अधिक असल्याचे दिसून येते.

विशेषतः डिलिव्हरी कर्मचारी, वाहन चालक आणि वाहन क्षेत्रातील कामगारांच्या वेतनात तब्बल १६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, तर उत्पादन क्षेत्रातील कुशल कामगारांना सुमारे ११ टक्क्यांची वाढ मिळाली आहे. याउलट प्रशासकीय आणि सहाय्यक भूमिकांतील व्हाइट-कॉलर कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा वेग तुलनेने खूपच संथ असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. मात्र, माहिती-तंत्रज्ञान (IT) क्षेत्र अजूनही सर्वाधिक मूळ वेतन देणारे क्षेत्र असून, त्यामध्ये दरवर्षी सुमारे १५ टक्क्यांची वाढ कायम आहे.

दरम्यान, वेतनवाढ होत असली तरी लिंग-आधारित वेतनातील तफावत अजूनही चिंतेचा विषय आहे. पुरुषांच्या वेतनात सरासरी ८.२४ टक्क्यांची वाढ होऊन ते १६,४५६ रुपयांवर पोहोचले, तर महिलांच्या वेतनात केवळ ५.६७ टक्क्यांची वाढ होऊन ते १३,८६३ रुपयांपर्यंतच मर्यादित राहिले. समान काम करूनही महिलांना कमी वेतन मिळत असल्याचे वास्तव या अहवालातून पुन्हा समोर आले आहे.

भौगोलिकदृष्ट्याही वेतनात मोठी तफावत दिसून येते. महानगरांमध्ये वेतनाचे प्रमाण अधिक असून, २०२५ मध्ये प्रमुख शहरांतील ब्लू-कॉलर कामगारांचे सरासरी वेतन १७,६९८ रुपये इतके नोंदवले गेले आहे. तर लहान शहरांमध्ये वेतनाची पातळी तुलनेने कमी असल्याचे दिसून येते.

या बदलांबाबत निलेश डूंगरवाल यांनी स्पष्ट केले की, अनेक वर्षे व्हाइट-कॉलर नोकऱ्यांनाच उच्च वेतनाचा मार्ग मानले जात होते. मात्र आता बाजारातील वास्तविक मागणी, कुशल कामगारांची कमतरता आणि कामाच्या स्वरूपातील बदल यामुळे ब्लू-कॉलर क्षेत्रात वेतनवाढ अधिक वेगाने होत आहे. तरीही, कौशल्यातील विषमता आणि लिंगभेद हे वेतन समानतेसमोरील मोठे अडथळे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments are closed.