महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार असून १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून, फेब्रुवारी–मार्च २०२६ परीक्षांची हॉल तिकिटे उद्यापासून उपलब्ध होणार आहेत.

ही हॉल तिकिटे ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असून, संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांचे प्रिंटआउट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावेत, अशा स्पष्ट सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.
बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, हॉल तिकीट वैध ठरण्यासाठी त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची सही व शिक्का असणे अनिवार्य आहे.
फोटो असलेल्या प्रवेशपत्रावर शिक्का व स्वाक्षरी केल्यानंतरच ते ग्राह्य धरले जाईल. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना हॉल तिकीट सोबत ठेवणे बंधनकारक असेल.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२ वीची परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी, व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा) ही १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. याआधी प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यमापन व NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेतल्या जाणार आहेत.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी वेळेत हॉल तिकीट मिळवून सर्व सूचना काळजीपूर्वक पाळाव्यात, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.