राज्यातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये सन्मान निधी दिला जातो.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने काही महिन्यांचे हप्ते रखडले होते. मात्र, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसेही लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली. ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख होती, मात्र अजूनही अनेक महिलांची केवायसी अपूर्ण आहे. केवायसी न केलेल्या तसेच अपात्र लाभार्थी महिलांची नावे यादीतून वगळली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात स्पष्ट शब्दांत सांगितले की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. उलट, या योजनेतून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून ‘लखपती दीदी’ बनवण्याचा सरकारचा निर्धार असल्याची घोषणा त्यांनी केली.

Comments are closed.