आतापर्यंत प्रामुख्याने आखाती देशांकडे जाणारे भारतीय कामगार आता रशियाकडे नव्या आशेने पाहू लागले आहेत. युक्रेन युद्धामुळे आणि देशातील घटत्या तरुण लोकसंख्येमुळे रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर बांधकाम, कारखाने, खाणी, तेल-गॅस रिफायनरी अशा अनेक क्षेत्रांत भारतीय कामगारांची मागणी झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार वर्षांत रशियात कामासाठी जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत सुमारे ६० टक्के वाढ झाली आहे.
रशियात काम करणाऱ्या सामान्य मजुराला किमान ५० हजार रुपये मासिक पगार मिळत असून, अनुभव आणि ओव्हरटाईमनुसार हे उत्पन्न १.५ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. आयटी आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ज्ञांना तर १.८ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज दिले जात आहे. विशेष बाब म्हणजे खाणी, ऑइलफिल्ड्स आणि रिफायनरीमध्ये काम करणाऱ्यांसाठी अनेक कंपन्या राहण्याची व जेवणाची मोफत सोय उपलब्ध करून देतात.
सध्या रशियामध्ये वेल्डर, सुतार, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, फॅक्टरी ऑपरेटर यांसारख्या ब्लू-कॉलर नोकऱ्यांना सर्वाधिक मागणी आहे. पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथील अनेक कामगार रशियात रोजगारासाठी जात आहेत. रशियन श्रम मंत्रालयानुसार, या दशकाच्या अखेरीस देशाला सुमारे १.१ कोटी अतिरिक्त कामगारांची गरज भासणार आहे.

Comments are closed.