नाशिक ग्रामीण पोलिसांच्या शिपाई भरती प्रक्रियेत मोठी चूक उघडकीस आली असून, लेखी परीक्षेत विचारलेल्या एका प्रश्नामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण?’ या प्रश्नाच्या पर्यायांमध्ये प्रत्यक्षात योग्य उत्तर असलेले Pu La Deshpande यांचे नावच नसल्याने अनेक उमेदवारांनी हरकत घेतली.

महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मान असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची सुरुवात १९९६ मध्ये झाली असून, पहिला पुरस्कार पु. ल. देशपांडे यांना प्रदान करण्यात आला होता. मात्र, परीक्षेत दिलेल्या पर्यायांमध्ये बाबा आमटे, विनोबा भावे, लता मंगेशकर आणि आचार्य अत्रे यांची नावे देण्यात आली होती, ज्यामुळे काही उमेदवारांनी प्रश्न सोडून दिला, तर काहींनी चुकीचे उत्तर निवडले.
ही चूक लक्षात आल्यानंतर प्रशासनाने सर्व उमेदवारांना सरसकट एक गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अंतिम गुणवत्ता यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, या भरती प्रक्रियेत २१० शिपाई आणि ५२ चालक पदांसाठी भरती सुरू असून, मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. लेखी परीक्षेसाठी सुमारे ३,१५६ उमेदवार पात्र ठरले होते, त्यापैकी २,५४० उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षेत चार वेगवेगळे प्रश्नसंच देण्यात आले होते, मात्र सर्वच संचांमध्ये हीच चूक आढळून आली.
एकूणच, या त्रुटीमुळे भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी, प्रशासनाने तातडीने निर्णय घेत सर्व उमेदवारांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

Comments are closed.