राज्यातील क्रीडा शिक्षणाला बळ देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर केंद्रस्तरीय विशेष क्रीडा शिक्षक संवर्गातील १,८६० नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील क्रीडा शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकास साधण्यासाठी क्रीडा शिक्षण आवश्यक असल्याची जाणीव ठेवून सरकारने राज्यातील सर्व समूह साधन केंद्रांसाठी प्रत्येकी एक क्रीडा शिक्षक पद मंजूर केले आहे. ही अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने, क्रीडा शिक्षक भरतीचा मार्ग आता खुला झाला आहे. याचा फायदा केवळ शिक्षकांनाच नव्हे, तर लाखो विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा शिक्षण मिळणार आहे.
ही भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे पूर्णपणे ऑनलाइन, पारदर्शक व मेरिट-आधारित पद्धतीने राबवली जाणार असल्याने, पात्र उमेदवारांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. क्रीडा शिक्षणाला दिलेल्या या प्राधान्यपूर्ण निर्णयाबद्दल शासनाचे विविध क्रीडा शिक्षक संघटनांकडून अभिनंदन करण्यात आले असून, भविष्यातही असे सकारात्मक निर्णय होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.