दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता सर्व २१ प्रवर्गातील दिव्यांग नागरिकांना विविध शासकीय योजना, सवलती, अनुदान व सुविधांचा लाभ देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असून, अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा प्रत्यक्ष फायदा पोहोचण्याची शक्यता आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव Tukaram Mundhe यांनी ही माहिती दिली.

यापूर्वी १९९५ च्या अधिनियमानुसार केवळ ७ प्रवर्गातील दिव्यांगांना हे लाभ मिळत होते. मात्र नव्या निर्णयानुसार आता अस्थिव्यंग, कुष्ठरोगमुक्त, मेंदूचा पक्षाघात, शारीरिक वाढ खुंटणे, स्नायूंची विकृती, आम्लहल्ला पीडित, पूर्ण किंवा अंशतः अंधत्व, कर्णबधिरता, वाचा/भाषा दोष, बौद्धिक अक्षम, विशिष्ट अध्ययन अक्षम, स्वमग्नता (Autism), मानसिक आजार, मल्टिपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, सिकल सेल, मज्जासंस्थेचे तीव्र आजार तसेच बहुविकलांग अशा सर्व २१ प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे किमान ४० टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व असल्याचे सक्षम प्राधिकरणाकडून दिलेले वैध “Unique Disability ID (UDID)” कार्ड असणे आवश्यक आहे.
एकूणच, हा निर्णय राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

Comments are closed.