रेल्वेत स्थिर, सन्मानजनक आणि दीर्घकालीन करिअर शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ट्रेन क्लर्क (Train Clerk – TNC) हे पद एक उत्तम संधी आहे. Indian Railways मध्ये ट्रेन क्लर्कला ‘गाडी बाबू’ असेही म्हटले जाते.
स्टेशन किंवा यार्ड पातळीवर ट्रेन संचालन, मालवाहतूक आणि नोंद व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी या पदावर असते.
ट्रेन क्लर्क होण्यासाठी Railway Recruitment Board (RRB) मार्फत घेतली जाणारी RRB NTPC (अंडरग्रॅज्युएट) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सध्या NTPC भरती प्रक्रियेत एकूण ३४४५ पदांपैकी काही जागा ट्रेन क्लर्कसाठी राखीव आहेत. ही सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी मानली जाते.
पात्रता व अटी:
उमेदवार १२वी उत्तीर्ण (किमान ५०% गुणांसह) असावा. SC/ST/OBC प्रवर्गांना नियमानुसार सवलत दिली जाते. वयोमर्यादा साधारण १८ ते ३० वर्षे आहे. भरती प्रक्रिया CBT-1, CBT-2, टायपिंग टेस्ट/CBAT, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांतून पूर्ण होते.
कामाची स्वरूप:
ट्रेन क्लर्कचे काम केवळ कार्यालयापुरते मर्यादित नसून, ट्रेन्सच्या आगमन–प्रस्थानाची नोंद, मालगाडी लोडिंग–अनलोडिंगची माहिती, दैनंदिन अहवाल तयार करणे, संगणकावर डेटा एंट्री करणे आणि स्टेशन मास्टर व ऑपरेटिंग स्टाफला अचूक माहिती पुरवणे यांचा समावेश होतो. त्यामुळे रेल्वेची कार्यपद्धती सुरक्षित व शिस्तबद्ध राहते.
वेतन व सुविधा:
७व्या वेतन आयोगानुसार पे लेव्हल–2 अंतर्गत ट्रेन क्लर्कला ₹19,900 मूळ वेतन मिळते. त्यासोबत DA, TA, HRA आदी भत्ते मिळून सुमारे ₹28,000 ते ₹29,000 इतका इन-हँड पगार होतो. सेवाकाळात पदोन्नती व वेतनवाढीच्या संधीही उपलब्ध असतात.
एकूणच, शिस्त, जबाबदारी आणि सुरक्षित भवितव्य हवे असलेल्या उमेदवारांसाठी रेल्वेतील ट्रेन क्लर्क (TNC) हे पद विश्वासार्ह आणि आकर्षक करिअर पर्याय ठरतो.

Comments are closed.