परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ड्रोन (रिमोट) पायलट बनण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त असलेल्या या प्रशिक्षण संस्थेमार्फत कुशल आणि प्रमाणित ड्रोन पायलट घडवले जात आहेत. या प्रशिक्षणात केवळ थिअरी नाही तर वर्ग शिक्षण, सिम्युलेटरवर सराव आणि प्रत्यक्ष ड्रोन उड्डाणाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते, त्यामुळे उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो.

या केंद्रात लघु श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (7 दिवस), मध्यम श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (7 दिवस) तसेच लघु व मध्यम श्रेणी संयुक्त कोर्स (10 दिवस) असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शेती, सर्वेक्षण, फोटोग्राफी, औद्योगिक वापर तसेच आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या कोर्ससाठी अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा आणि त्याचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच वैध वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. प्रवेशावेळी उमेदवारांनी चार पासपोर्ट साइज फोटो (पांढऱ्या पार्श्वभूमीसह), दहावीची मूळ गुणपत्रिका व प्रमाणपत्र, आधार कार्ड, एक अतिरिक्त ओळखपत्र (पासपोर्ट/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/रेशन कार्ड), सर्व कागदपत्रांच्या स्वयंघोषित प्रती आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहेत.
अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ – रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे थेट संपर्क साधावा. पात्र माजी सैनिक उमेदवारांनी दूरध्वनी क्रमांक +91 7550003705 किंवा ई-मेल vn********@***il.com वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे (ले. कर्नल हंगे स. दै. नि.) यांनी केले आहे.
ड्रोन तंत्रज्ञानात भविष्य घडवायचे असेल, तर ही DGCA मान्यताप्राप्त ड्रोन पायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधी नक्कीच दवडू नका.

Comments are closed.