बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचं काय होणार, हा प्रश्न आता खूप गंभीर झाला आहे. बीबीए, बीसीए, बीएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला यंदा जबरदस्त विलंब झाला.
दोन वेळा सीईटी परीक्षा घेण्यात आल्यामुळे वेळ निघून गेला, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर मार्ग निवडले. राज्यभरात उपलब्ध असलेल्या तब्बल एक लाख जागांपैकी तब्बल ६५ टक्के जागा अजूनही रिक्तच आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आदेशामुळे यंदाही सीईटी परीक्षा दोनदा घेण्यात आली. पण प्रवेश प्रक्रिया उशिरा म्हणजे थेट ऑगस्टअखेरीस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी आधीच इतर अभ्यासक्रमांचा विचार सुरू केला होता. बीबीए-बीएमएस, बीसीए-एमसीए इंटिग्रेटेड या दोन्ही अभ्यासक्रमांत विद्यार्थ्यांचा रस लक्षणीयरीत्या घटला आहे.
राज्यातील एकूण १,०५,०६१ जागांपैकी फक्त ३६,८१२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, म्हणजे तब्बल ६४.९६ टक्के जागा रिक्त! बीसीए-एमसीए इंटिग्रेटेड अभ्यासक्रमात ४८,३९३ पैकी १६,९९० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला, तर बीबीए-बीएमएस अभ्यासक्रमात ५६,६६८ पैकी फक्त १९,८२२ विद्यार्थ्यांनीच नाव नोंदवलं.
या सगळ्या रखडपट्टीमुळे आणि प्रशासनिक गोंधळामुळे विद्यार्थी-पालकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. सीईटीच्या तारखा पुढे ढकलल्या गेल्याने विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग, सायन्स, कॉमर्स किंवा इतर शॉर्ट-टर्म कोर्सेसकडे वळण घेतले.
विद्यापीठांमधील आणि खासगी महाविद्यालयांमधील शेकडो जागा आजही रिक्त आहेत. यामुळे महाराष्ट्रातील व्यावसायिक शिक्षणाचं भवितव्य सध्या धोक्यात आलं असल्याचं शैक्षणिक तज्ज्ञांचे मत आहे.

Comments are closed.