दहावी–बारावीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त आणि गळतीमुक्त करण्यासाठी बारामती तालुक्यात अत्याधुनिक ‘हायटेक डिजिटल जीपीएस-लॉक पेट्या’चा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा प्रयोग केवळ स्थानिक मर्यादित न राहता ‘बारामती पॅटर्न’ म्हणून राज्यभर आदर्श ठरण्याची शक्यता आहे. तालुक्यातील २९ परीक्षा केंद्रांवर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, सुमारे १७,२०० विद्यार्थी या सुरक्षित व्यवस्थेत परीक्षा देत आहेत.

या नव्या प्रणालीअंतर्गत प्रश्नपत्रिका ठेवलेल्या डिजिटल पेट्या फक्त संबंधित परीक्षा केंद्रावर आणि ठरलेल्या वेळेलाच उघडतील. जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे पेट्यांचे थेट ट्रॅकिंग केले जाते. आर. एन. अगरवाल टेक्निकल हायस्कूल येथून प्रश्नपत्रिका केंद्रापर्यंत वाहतुकीदरम्यान जर ठराविक ठिकाणाबाहेर पेटी उघडण्याचा प्रयत्न झाला, तर तात्काळ इशारा मिळतो. त्यामुळे प्रश्नपत्रिका गळती किंवा छेडछाड रोखणे शक्य झाले आहे.
कॉपीप्रवण व संवेदनशील केंद्रांवर भरारी पथके, सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वतंत्र नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून त्रिस्तरीय देखरेख ठेवण्यात आली आहे. लोकेशन-लॉक तंत्रज्ञान, थेट जीपीएस ट्रॅकिंग आणि प्रशासकीय नियंत्रण या त्रिसूत्री सुरक्षेमुळे परीक्षा व्यवस्थापन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनले आहे.
डिजिटल पेटी केंद्रावर पोहोचल्यानंतर निर्धारित वेळेत सेंट्रल लॉक आपोआप उघडते. तांत्रिक अडचण आल्यास ‘आरएफआयडी कार्ड’ किंवा कंपनीकडून मिळालेल्या आठ अंकी पासवर्डद्वारे लॉक उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत लॉक-अनलॉक किंवा ट्रॅकिंगमध्ये कोणतीही अडचण आलेली नाही.
एकूणच, बारामतीतील हा प्रयोग परीक्षा व्यवस्थापनातील नवी दिशा दाखवणारा ठरत असून, भविष्यात टप्प्याटप्प्याने राज्यभर अशीच प्रणाली राबवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.