छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (BAMU) संलग्न महाविद्यालयांच्या प्रशासकीय व शैक्षणिक अंकेक्षणातून उच्च शिक्षण क्षेत्रातील गंभीर वास्तव समोर आले आहे. तपासणीस पात्र ठरलेल्या ४१८ महाविद्यालयांपैकी तब्बल १५७ महाविद्यालये कोणत्याही श्रेणीत बसण्यास अपात्र ठरली असून, त्यांना थेट ‘नो ग्रेड’ देण्यात आली आहे.

पायाभूत सुविधा, पात्र शिक्षक, मान्यताप्राप्त प्राचार्य, ग्रंथालये, प्रयोगशाळा, संगणक लॅब, स्वच्छतागृहे, वर्गखोल्या, इंटरनेट सुविधा अशा मूलभूत निकषांमध्ये ही महाविद्यालये कमी पडली आहेत. विद्यापीठाने ४५० गुणांच्या आधारे हे अंकेक्षण केले असून, १८० पेक्षा कमी गुण मिळालेल्या महाविद्यालयांना ‘नो ग्रेड’ घोषित करण्यात आले आहे.
जाहीर केलेल्या तात्पुरत्या यादीत केवळ एकाच महाविद्यालयाला ‘अ++’ दर्जा मिळाला, तर ‘अ+’ श्रेणीत १३, ‘अ’ श्रेणीत ३८, ‘बी’ व ‘बी+’ मध्ये एकूण ११५ आणि ‘सी’ श्रेणीत ८० महाविद्यालयांचा समावेश आहे. याशिवाय काही महाविद्यालयांनी प्रतिसाद दिला नाही किंवा तपासणीच झाली नाही.
विद्यापीठ प्रशासनाने हरकती व दुरुस्तींसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली असून, आवश्यक पुराव्यासह संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी २०२२ मधील ऑडिटनंतर ‘नो ग्रेड’ मिळालेल्या महाविद्यालयांवर एक वर्ष प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे यावेळीही अशाच कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
या अहवालानंतर उच्च शिक्षण विभागाचे लक्ष विद्यापीठाच्या पुढील कारवायांकडे लागले असून, मूलभूत सुविधा नसलेल्या महाविद्यालयांवर काय निर्णय घेतला जाणार, याकडे विद्यार्थी व प्राध्यापकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

Comments are closed.