‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. मात्र, या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्मान कार्ड मिळवताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या आयुष्मान कार्ड महा ई-सेवा केंद्रांमार्फत दिले जात असले तरी, प्रत्यक्षात हे कार्ड फक्त रेशनकार्डधारकांनाच दिले जात असल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेकांकडे वैध रेशनकार्ड असूनही तांत्रिक त्रुटी, नावातील फरक, अपूर्ण माहिती किंवा ऑनलाइन प्रणालीतील अडथळ्यांमुळे कार्ड मिळत नाही.
यामुळे पात्र असूनही अनेक कुटुंबे आयुष्मान योजनेपासून वंचित राहत आहेत. ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना खासगी रुग्णालयातील खर्च परवडणारा नसल्याने, आयुष्मान योजनेचा आधार अत्यंत आवश्यक असताना कार्ड मिळण्यातच अडथळे येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नेमक्या अडचणी काय?
महा ई-सेवा केंद्रात सर्वप्रथम रेशनिंग मिळते का, याची चौकशी
रेशनिंग नसल्यास कार्ड नाकारले जाते
वारंवार केंद्रांवर हेलपाटे मारावे लागतात
नागरिकांची मागणी
सर्व रेशनकार्डधारकांना ऑनलाइन बारा अंकी क्रमांक देण्यात यावा. यासाठी पुरवठा विभाग व तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
बारा अंकी नंबर का महत्त्वाचा?
रुग्ण तातडीने दाखल झाल्यास तहसीलदारांकडून रेशनकार्डवर बारा अंकी नंबर घेतला जातो. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच आयुष्मान कार्ड उपलब्ध असेल, तर नातेवाईकांची धावपळ टळू शकते.
पूर्वी रेशनिंगची अट होती, आता ती नाही. सर्व रेशनकार्ड ऑनलाइन करून बारा अंकी क्रमांक दिल्यासच सर्वसामान्यांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळू शकेल, असे मत डॉ. देवीदास बागल (समन्वयक, आयुष्मान भारत योजना, सातारा) यांनी व्यक्त केले आहे.

Comments are closed.