केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग (NCISM), नवी दिल्ली यांनी देशभरातील नवीन ३१ आयुर्वेद महाविद्यालयांना मंजुरी दिली असून, त्यापैकी २० महाविद्यालयांना महाराष्ट्रात मान्यता मिळाली आहे. यामध्ये विदर्भातील सात महाविद्यालयांचा विशेष समावेश आहे.

‘बीएएमएस’ अभ्यासक्रमासाठी सादर झालेल्या प्रस्तावांची तपशीलवार पडताळणी करून ही मान्यता देण्यात आली. मान्यता मिळाल्यावर या सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे.
विदर्भातील मंजूर महाविद्यालयांमध्ये अकोला, नागपूर (२), शेगाव, कारंजा लाड, गोंदिया येथील संस्थांचा समावेश आहे. राज्यातील अनेक मान्यवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या संस्थांनाही मान्यता मिळाली आहे. यामध्ये रक्षा खडसे (मुक्ताईनगर), राधाकृष्ण विखे पाटील (लोणी), विजयसिंह मोहिते पाटील (अकलुज), राजेंद्र येड्रावकर (इचलकरंजी), किर्ती गवई (कारंजा), अब्दुल सत्तार (सिल्लोड), किशोर दराडे (येवला), राहुल पाटील (सिंधुदुर्ग), नितीन पाटील (हतनूर), डॉ. सुधीर ढोणे (बाभुळगाव, अकोला) यांच्या संस्थांचा समावेश आहे.
गतवर्षी देखील केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव व माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या संस्थांना मान्यता मिळाली होती. सर्व महाविद्यालयांची पडताळणी तज्ज्ञ समितीद्वारे नियमांनुसार करण्यात आली असून पुढील पाच वर्षांची अनामत रक्कमही महाविद्यालयांकडून वसूल केली आहे. नवीन मंजूर महाविद्यालयांना ६० किंवा १०० विद्यार्थ्यांच्या तुकडीचा आकार दिला गेला आहे.
सध्या प्रवेशाची चौथी फेरी सुरू असून विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Comments are closed.