लांडेवाडीत खगोलशास्त्राची झलक!-Astronomy Career Guidance Session!

Astronomy Career Guidance Session!

लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे विद्यार्थ्यांसाठी ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमी रिसर्च अँड करिअर’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले. श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त आयोजनात झालेल्या या उपक्रमात इयत्ता सहावी ते आठवी तसेच अकरावीतील सुमारे ५२० विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

Astronomy Career Guidance Session!या सत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून Inter-University Centre for Astronomy and Astrophysics (IUCAA), पुणे येथील पोस्ट-डॉक्टोरल फेलो डॉ. सारंग शाह उपस्थित होते. त्यांनी खगोलशास्त्रातील संशोधन कसे केले जाते याची ओळख करून देताना ऑप्टिकल, इन्फ्रारेड, एक्स-रे, गॅमा किरणे आणि रेडिओ वेधशाळांची माहिती सोप्या भाषेत स्पष्ट केली.

खगोल संशोधनात मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर कसा होतो, हे उदाहरणांसह सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण केली. तसेच चिलीतील सेरो पाचोन पर्वतावर उभारण्यात आलेल्या Vera C. Rubin Observatory या अत्याधुनिक वेधशाळेबाबत माहिती देत, ८.१ मीटर व्यासाचा मुख्य आरसा आणि ३ गिगापिक्सेल क्षमतेच्या कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये सांगितली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सत्र अधिक संवादात्मक झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. शाह यांचा सत्कार करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे अशा शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन शक्य होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. प्रशासकीय अधिकारी प्रा. शामल चौधरी, प्राचार्या शबनम मोमीन, प्राचार्या रजनी बाणखेले, शिक्षकवृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन महादेव गायकवाड यांनी केले, तर विज्ञान शिक्षक सतीश भेरे यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली.

या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राबद्दलची जिज्ञासा वाढली असून, संशोधन व विज्ञानाधारित करिअरकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Comments are closed.