बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रशासनिक व्यवस्थापन आणखी मजबूत करण्यासाठी सहाय्यक आयुक्त पदांवर पूर्णकालिक नियुक्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी उपप्रमुख अभियंता आणि कार्यकारी अभियंता संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते.
या प्रक्रियेत एकूण १२ अर्ज महापालिकेकडे आले आहेत. हे सर्व अर्ज ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दाखल झाले असून, आता या अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माहितीनुसार, पात्र उमेदवारांच्या मुलाखती १० आणि १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. या मुलाखती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी जोशी यांच्या दालनात पार पडतील. निवड झालेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईतील विविध वॉर्डांमध्ये केली जाईल.
गेल्या वर्षभरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ७ ते ८ नवीन सहाय्यक आयुक्तांनी महापालिकेत रुजू होऊन कामकाज सुरू केले आहे. मात्र अजूनही अनेक वॉर्डांमध्ये प्रभारी साहाय्यक आयुक्तांवरच कारभार चालतो आहे. हे प्रभारी अधिकारी बहुधा कार्यकारी अभियंता संवर्गातील असल्याने वॉर्डस्तरावरील दैनंदिन प्रशासकीय कामे आणि नागरिकांच्या तक्रारी प्रभावीपणे हाताळण्यात अडचणी येतात.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पूर्णकालिक कार्यभार तत्त्वावर सहाय्यक आयुक्त नेमणुकीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे प्रत्येक वॉर्डात स्वतंत्र आणि जबाबदार अधिकारी उपलब्ध होणार असल्याने स्थानिक प्रशासन अधिक सक्षम आणि पारदर्शक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
सध्या काही वॉर्डांमध्ये अतिक्रमण निर्मूलन, करनिर्धारण आणि संकलन, तसेच पश्चिम आणि पूर्व उपनगरातील अतिक्रमण नियंत्रण यांसारख्या जबाबदाऱ्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांवर सोपवण्यात आल्या आहेत. मात्र लवकरच नवीन पूर्णकालिक अधिकारी रुजू झाल्यानंतर हे सर्व विभाग अधिक गतीने कार्यरत होतील, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Comments are closed.