‘अपार’ आयडीमुळे बारावीचे विद्यार्थी अडचणीत; प्रवेश परीक्षेवर प्रश्नचिन्ह! | APAAR ID Puts HSC Students in Trouble!

APAAR ID Puts HSC Students in Trouble!

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) सीईटी नोंदणीसाठी ‘अपार’ आयडी बंधनकारक केल्याने राज्यातील अनेक बारावीचे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. ठरलेल्या मुदतीत अपार आयडी तयार न झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

APAAR ID Puts HSC Students in Trouble!

मागील वर्षापासून राज्यभर अपार आयडी तयार करण्याची मोहीम सुरू असली तरी अद्याप सर्व विद्यार्थ्यांचे आयडी पूर्ण झालेले नाहीत. विशेषतः शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी अत्यावश्यक ठरला आहे, कारण आयडी नसल्यास कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करता येणार नाही, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

नाशिक जिल्ह्याचा विचार करता बारावीत शिक्षण घेणारे एकूण ७७,७५१ विद्यार्थी असून त्यापैकी ६९,३२४ विद्यार्थ्यांचे (८९.१६ टक्के) अपार आयडी तयार झाले आहेत, तर अद्याप ८,४२७ विद्यार्थ्यांचे आयडी बाकी आहेत. या विद्यार्थ्यांना अपार आयडी तयार होईपर्यंत प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करता येणार नसल्याने त्यांच्यासमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. अपार आयडीसाठी सीईटी सेलने स्वतंत्र मुदत जाहीर न केल्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी उर्वरित विद्यार्थ्यांचे आयडी तातडीने तयार करणे गरजेचे बनले आहे.

दरम्यान, सीईटी सेलमार्फत १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते, त्यापैकी सात अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया ५ ते १० जानेवारीदरम्यान सुरू झाली आहे, तर उर्वरित अभ्यासक्रमांच्या नोंदणीही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचा अपार आयडीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची जबाबदारी शाळा प्रशासनावर आली असून, अन्यथा अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.