येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक महिन्यांपासून विविध पदे रिक्त आहेत. मात्र शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून डॉक्टर व कर्मचारी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

आरोग्य केंद्रातील शिपाई, आरोग्यसेवक आणि परिचारिका ही महत्त्वाची पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. शासनाकडून काही कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली असली तरी त्यांनी अद्याप हजर राहिलेले नाही. त्यामुळे इतर उपकेंद्रांमधील कर्मचाऱ्यांना तात्पुरते या ठिकाणी बोलावून सेवा देण्यात येत आहे.
आंबोली हा दुर्गम आणि पर्यटनदृष्ट्या संवेदनशील भाग असल्याने, आरोग्य केंद्र येथे नेहमी सक्षम असणे अत्यावश्यक आहे. विशेषतः पर्यटकांची गर्दी वाढल्यावर येथील डॉक्टरांना प्रचंड ताण सहन करावा लागतो.
सध्या येथे डॉ. महेश जाधव आणि डॉ. आदिती पाटकर हे दोघे डॉक्टर मनापासून सेवा देत आहेत. मात्र, सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. रुग्णसेवा अडचणीत येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी शासनाला विनंती केली असून, रिक्त पदे तात्काळ भरून आरोग्य केंद्र सक्षम करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Comments are closed.