जगातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन (Amazon) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीच्या तयारीत आहे. त्यांच्या खर्च कपात आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून कंपनी २८ ऑक्टोबर २०२५ पासून तब्बल ३०,००० कॉर्पोरेट पदे कमी करणार असल्याचे वृत्त आहे. ही कपात २०२२ नंतरची सर्वात मोठी ठरणार आहे.

कोविड काळात ऑनलाइन खरेदीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे अमेझॉनने कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती केली होती. मात्र आता ग्राहकांच्या खर्चात घट आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, कंपनीने जलद वाढीऐवजी स्थिर नफा मिळविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
कंपनीच्या १.५५ दशलक्ष जागतिक कर्मचाऱ्यांपैकी ही कपात छोटा भाग असली, तरी ३५०,००० कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १० टक्क्यांवर तिचा थेट परिणाम होईल. विशेषतः कंपनीच्या People eXperience Technology (PXT) विभागावर याचा मोठा फटका बसणार आहे. या विभागातील सुमारे १५% कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याची शक्यता आहे.
याशिवाय, Amazon च्या मुख्य ग्राहक व्यवसाय विभागांवरही या कपातीचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. कंपनीने या नियोजित टाळेबंदीबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, व्यवस्थापकांना कर्मचार्यांशी संवाद साधण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे समजते.
कर्मचार्यांना याबाबतची माहिती मंगळवारी सकाळी ईमेलद्वारे देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
लाइव्हमिंटच्या माहितीनुसार, CEO अँडी जॅसी यांनी २०२२ ते २०२३ या काळात अमेझॉनच्या इतिहासातील सर्वात मोठी कपात केली होती, ज्यात २७,००० हून अधिक कॉर्पोरेट पदे कमी करण्यात आली होती. त्यानंतर अनेक इतर तंत्रज्ञान कंपन्यांनीही कर्मचारी कपातीचा मार्ग स्वीकारला होता.
आता पुन्हा एकदा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कार्यपद्धतीचा अवलंब करून अमेझॉन आपल्या व्यवसायाची पुनर्रचना आणि स्वयंचलन वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रक्रियेमुळे कार्यक्षमता वाढेल, परंतु हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ही नवी रचना तंत्रज्ञानाच्या युगातील बदलाचे प्रतिक असली, तरी तिचा मानवी परिणाम गंभीर ठरू शकतो, अशी तज्ज्ञांची चिंता आहे.

Comments are closed.