जागतिक ई-कॉमर्स दिग्गज अमेझॉन पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या अहवालानुसार, कंपनी २८ ऑक्टोबरपासून तब्बल ३०,००० कॉर्पोरेट पदे कमी करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. ही २०२२ नंतरची आतापर्यंतची सर्वात मोठी टाळेबंदी ठरणार आहे.
ही हालचाल अमेझॉनच्या खर्च नियंत्रण आणि कार्यपद्धती सुधारणा धोरणाचा एक भाग आहे. कोविड काळात वाढलेल्या ऑनलाईन मागणीमुळे कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी नेमले होते. मात्र, आता ग्राहक खर्चात घट आणि जागतिक आर्थिक मंदीमुळे कंपनीने झपाट्याने वाढीऐवजी स्थिर नफ्याकडे लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या टाळेबंदीचा परिणाम अमेझॉनच्या एकूण १.५५ दशलक्ष कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १०% कॉर्पोरेट कर्मचार्यांवर होणार आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या PXT (People eXperience and Technology) विभागावर सर्वाधिक परिणाम होईल अशी शक्यता आहे.
अमेझॉनने या निर्णयावर अधिकृत भाष्य केले नसले तरी, अंतर्गत पातळीवर व्यवस्थापकांना संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. अपेक्षित आहे की, मंगळवारी सकाळी ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांना टाळेबंदीची माहिती देण्यात येईल.
पूर्वी २०२२-२३ दरम्यानही सीईओ अँडी जॅसी यांच्या नेतृत्वाखाली २७,००० हून अधिक पदे कमी करण्यात आली होती. आता नव्या फेरीत कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्दिष्टाने आणखी एक मोठा टप्पा गाठणार आहे.

Comments are closed.