जागतिक ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉन पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. जगभरातील तब्बल ३० हजार कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याची तयारी कंपनीने केली असून, हे त्यांच्या एकूण मनुष्यबळाच्या जवळपास १० टक्के आहे. आजपासूनच या कपातीची प्रक्रिया सुरू होत आहे.
कोरोनाच्या काळात कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती केली होती. त्या वेळी झालेल्या ‘ओवरहायरींग’चा भार कमी करण्यासाठी आणि वाढता खर्च आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही कपात २०२२ नंतरची आतापर्यंतची सर्वात मोठी ठरणार आहे.
या नव्या फेरीचा फटका मुख्यतः मानव संसाधन, डिव्हाईस, सर्व्हिसेस आणि ऑपरेशन्स या विभागांना बसणार आहे.
अॅमेझॉनचे सीईओ अँडी जेसी यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहे आणि त्यामुळे पुनरावृत्तीची कामे करणाऱ्या अनेक नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ‘ओवरहायरींग’सह तंत्रज्ञानातील बदल हीही मोठ्या कपातीची महत्त्वाची कारणे ठरत आहेत.
या निर्णयामुळे अॅमेझॉनमधील कर्मचाऱ्यांसोबतच संपूर्ण टेक इंडस्ट्रीमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, अनुभवी कर्मचाऱ्यांनाही नोकरी टिकवण्याबाबत अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.

Comments are closed.