जगातील आघाडीची टेक कंपनी ॲमेझॉनने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. यावेळी जगभरात सुमारे 16,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. मंगळवारी कंपनीने ही कपात जाहीर केली.
कोविड काळात करण्यात आलेल्या अतिरिक्त भरतीचा ताण कमी करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मनुष्यबळ विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा ईमेल सोशल मीडियावर लीक झाला होता, ज्यामध्ये या कपातीचे संकेत दिले गेले होते.
याआधी ऑक्टोबर 2025 मध्ये 14,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. सध्याच्या निर्णयासह पाहता, अवघ्या काही महिन्यांत एकूण 30,000 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. ही संख्या 2022–23 मधील मोठ्या कपातीच्या जवळ जाणारी आहे.
ॲमेझॉनच्या ‘पीपल एक्सपीरियन्स अँड टेक्नॉलॉजी’ विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा बेथ गॅलेट्टी यांनी सांगितले की, या निर्णयाचा हजारो भूमिकांवर परिणाम होणार असून, प्रभावित कर्मचाऱ्यांना मदतीसाठी कंपनी प्रयत्न करणार आहे. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना अंतर्गत बदलीसाठी 90 दिवसांची मुदत, अन्यथा सेव्हरन्स पॅकेज, आरोग्य विमा आणि करिअर सहाय्य दिले जाणार आहे.
सध्या ॲमेझॉनमध्ये सुमारे 15.7 लाख कर्मचारी कार्यरत असून, त्यातील मोठा हिस्सा वेअरहाऊसमधील आहे. कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 3.5 लाख असून, नव्या कपातीमुळे त्यातील सुमारे 4.6 टक्के पदे कमी होणार आहेत.
दरम्यान, CEO अँडी जॅसी यांनी व्यवस्थापनातील स्तर कमी करणे, निर्णय प्रक्रिया वेगवान करणे आणि भविष्यात AI व ऑटोमेशनमुळे कर्मचारीसंख्या आणखी घटू शकते, असे संकेत दिले आहेत. कंपनी 5 फेब्रुवारी रोजी आपले तिमाही आर्थिक निकाल जाहीर करणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.