अकोला जिल्हा परिषदेत शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, तब्बल २६८ शिक्षकांनी खोट्या माहितीच्या आधारे बदलीचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे आणि खोट्या आजारांच्या कागदपत्रांच्या आधारे सोयीच्या ठिकाणी बदली मिळवण्यात आल्याचे समोर आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते गणेश कुरई यांच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघड झाला असून, आतापर्यंत ९ शिक्षक आणि एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित शिक्षक आणि संबंधित अधिकारी चौकशीच्या कक्षेत आले असून शिक्षण विभागाकडून कारवाई सुरू आहे.
या प्रकरणात बोगस कर्णबधीर प्रमाणपत्र, खोटे आजार, चुकीचे अंतर दाखवणे अशा अनेक अनियमितता आढळल्या आहेत. नियमांनुसार तपासणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून होणे आवश्यक असताना, ती जाणीवपूर्वक इतर स्तरावर करून बोगस प्रमाणपत्रांना मंजुरी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नसून मोठा संघटित घोटाळा असल्याचे सांगण्यात येत असून, संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Comments are closed.