शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवून आणत केंद्र सरकारने तिसऱ्या इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून देशभरातील सर्व शाळांमध्ये लागू होणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी सांगितले की, केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व शाळांच्या अभ्यासक्रमात एआय विषयाचा समावेश करण्यासाठी तयारी सुरू आहे. दोन वर्षांच्या आत तिसरीपासून एआय शिकविण्याची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी अभ्यासक्रम आणि शिक्षक प्रशिक्षण या दोन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात काम होणार आहे.
एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
देशभरात सध्या एक कोटीहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व शिक्षकांना एआय शिकविण्यास सक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण देणे हे शिक्षण व साक्षरता विभागासमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे.
अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) सध्या वर्गनिहाय एआय अभ्यासक्रम तयार करीत आहे. यासाठी आयआयटी मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्यात आली आहे.
शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, सध्याची शिक्षण पद्धती अधिक भविष्याभिमुख करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी सज्ज करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
सध्या सीबीएसई शाळांमध्ये सहावी ते बारावीपर्यंत एआय विषय शिकविला जातो. मात्र, आता तिसरीपासूनच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांची डिजिटल पिढीकडे वाटचाल सुरु होणार आहे.

Comments are closed.