२०२५ हे वर्ष जागतिक आयटी क्षेत्रासाठी धक्कादायक ठरले आहे. मंदी नसतानाही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) झपाट्याने झालेल्या विस्तारामुळे आणि ऑटोमेशनमुळे तब्बल १ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.
उद्योगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, २०० पेक्षा जास्त टेक कंपन्यांमध्ये ही नोकरकपात झाली असून, याची नोंद ‘ट्रूअप लेऑफ ट्रॅकर’मध्ये आहे.
कंपन्या आता AI टूल्सद्वारे होणारी कामे मानवी मनुष्यबळाऐवजी तंत्रज्ञानावर सोपवत आहेत. अनेक सीईओंनी उघडपणे सांगितले आहे की, पारंपरिक भूमिका कमी करून वाचलेला खर्च AI संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञानात गुंतवला जात आहे.
गुगल (Alphabet) ने क्लाउड विभागासह काही युनिट्समधील १०० हून अधिक पदे कमी करत AI चिप्स व मूलभूत मॉडेल्सवर लक्ष केंद्रीत केले आहे.
मायक्रोसॉफ्ट ने OpenAI सोबत भागीदारी वाढवत सुमारे ९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
अॅक्सेंचर ने कौशल्ये बदलण्यास अयोग्य ठरणाऱ्या ११,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
टीसीएस ने AI मुळे निर्माण झालेल्या कौशल्य विसंगतीचा हवाला देत जवळपास १२,००० कर्मचाऱ्यांना कमी केले.
तर ओरेकल ने क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर पुनर्रचनेत ३,००० हून अधिक नोकर्या संपुष्टात आणल्या आहेत.
एकूणच, AI-केंद्रित कामकाजाशी जुळवून न घेऊ शकणाऱ्या कर्मचाऱ्यांऐवजी उच्च कौशल्ये आणि ‘एजेंटिक AI’मध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाला प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट संकेत या नोकरकपातीमधून मिळत आहेत.

Comments are closed.