गुगलच्या सीईओ सुंदर पिचाई यांनी सध्या एआय क्षेत्रातील प्रगती आणि गुंतवणुकीवर भाष्य करताना धोके अधोरेखित केले आहेत. ते म्हणाले की, एआय क्रिएटिव्ह कामासाठी उपयुक्त आहे, परंतु युजर्सनी त्याच्या मर्यादा समजून घ्याव्यात. बीबीसी न्यूजशी बोलताना पिचाई यांनी सांगितले की, एआयमधील गुंतवणुकीत झालेली वाढ असामान्य आहे, आणि सध्याच्या तेजीत काही प्रमाणात अविवेकीपणा दिसून येतो.

सिलीकोन व्हॅलीसह इतर ठिकाणीही ही चिंता आहे की, एआय कंपन्यांचे मूल्य गेल्या काही महिन्यांत प्रचंड वाढले आहे आणि कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे एआयचा फुगा फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिचाई म्हणाले की, गुगल या संभाव्य परिणामांचा सामना करू शकेल, परंतु कोणतीही कंपनी या परिस्थितीत पूर्णपणे सुरक्षित राहणार नाही.
त्यांनी युजर्सना देखील इशारा दिला की, एआयकडून मिळणाऱ्या माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. मे महिन्यात गुगलच्या सर्च इंजिनमध्ये जेमिनी चॅटबॉटद्वारे एआय मोड सुरू झाला असून, पिचाई म्हणाले की, “आम्ही शक्य तितकी अचूक माहिती देण्यासाठी काम करत आहोत, परंतु सध्याच्या अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानात काही त्रुटी आहेत.”
गुगलच्या एआय धोरणाबाबत बोलताना पिचाई यांनी सांगितले की, चिप्स आणि डेटापासून ते एआय मॉडेल्स आणि प्रगत संशोधनापर्यंत संपूर्ण तंत्रज्ञान साखळीवर गुगलची ताकद आहे. यामुळे कंपनी कोणत्याही एआय बाजारपेठेतील परिणामांना तोंड देण्यासाठी तयार आहे.

Comments are closed.