अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजातील प्राध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेवर न्यायालयाने पुन्हा शिक्कामोर्तब केले असून, ही प्रक्रिया आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली नव्याने राबविली जाणार आहे. विद्यापीठाने तीन महिन्यांत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, त्यातील एक महिना संपला असल्याने पुढील दोन महिन्यांत भरती पूर्ण करणे आवश्यक आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सदर भरती प्रक्रिया पूर्वी संस्थेच्या अखत्यारीत घेण्यात आली होती. मात्र, भ्रष्टाचार, अनियमितता आणि गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे ती रद्द करण्यात आली. या तक्रारींमुळे संस्थेतील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, तसेच संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी राजीनामा सुद्धा दिला.
प्राध्यापक भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी व काही पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तपासणी करून विद्यापीठाला स्पष्ट आदेश दिले की, संपूर्ण भरती प्रक्रिया विद्यापीठाच्या देखरेखीखाली आणि पारदर्शक पद्धतीने नव्याने राबवावी. त्यासाठी नवीन निवड समिती गठीत करण्याचेही निर्देश देण्यात आले.
सध्या संस्थेकडून भरतीसाठी आवश्यक माहिती विद्यापीठाला सुपूर्द करण्यात आली असून, पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनाच पुन्हा मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. तीन महिन्यांच्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल, त्यामुळे विद्यापीठाकडून या भरतीला प्राधान्याने गती देण्यात येत आहे.

Comments are closed.