महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी भरती जाहीर झाली असली, तरी या भरती प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.

संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भात गेल्या 5–6 महिन्यांपासून वयोमर्यादेत सवलत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
शासनाने गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा 28 वरून 35 वर्षांपर्यंत वाढवली, मात्र त्याच विभागातील पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ 1 वर्षाची सवलत देण्यास विलंब का होत आहे? असा थेट सवाल उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे PSI पदासाठी तात्काळ 1 वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी, ही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी शासनाकडे केली आहे.
विशेष म्हणजे PSI पदाची जाहिरात प्रसिद्ध होण्यास तब्बल 7 महिन्यांचा विलंब झाला असून, वयोमर्यादा गणनेचा दिनांक 1 नोव्हेंबर 2025 निश्चित केल्याने काही दिवसांच्या फरकामुळे हजारो उमेदवारांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेसाठी 1 जानेवारी 2025 हा दिनांक ग्राह्य धरावा, अशी ठाम मागणी उमेदवारांनी केली आहे. या सर्व मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने सकारात्मक भूमिकेतून तात्काळ निर्णय घ्यावा व विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा, असे आवाहन शरद पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही केले आहे.
दरम्यान, एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब) 2025 च्या जाहिरातीनुसार एकूण 674 पदांची भरती होणार असून, त्यापैकी 392 पदे पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी आहेत. या परीक्षेमुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकवेळची विशेष संधी देण्याची मागणी परीक्षार्थ्यांकडून करण्यात येत आहे. उमेदवारांच्या वाढत्या दबावामुळे वयोमर्यादेसंदर्भात शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.