वयोमर्यादा ओलांडली तरी संधी कायम! एमपीएससी गट-ब, गट-क परीक्षांसाठी मोठा दिलासा! | Age Relaxation Granted for MPSC Group Exams!

Age Relaxation Granted for MPSC Group Exams!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची विशेष शिथिलता जाहीर केली आहे. या निर्णयामुळे यापूर्वी वयोमर्यादा ओलांडल्याने अपात्र ठरलेल्या उमेदवारांना आता महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांना ६ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

Age Relaxation Granted for MPSC Group Exams!

एमपीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींच्या अनुषंगाने, एकदाच विशेष बाब म्हणून ही वयोमर्यादा शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे पूर्वीच्या नियमांमुळे वंचित राहिलेल्या अनेक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने मागासवर्गीयांसाठी शासकीय सेवांतील पदांवर आरक्षणाच्या तरतुदीनुसार सुधारित मागणीपत्रे एमपीएससीकडे सादर केली होती. त्यानुसार आयोगाने या परीक्षांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या.

उमेदवारांना २६ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत अर्ज सादर करता येणार असून, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदतही ६ जानेवारी आहे. विशेष बाब म्हणजे, नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना केवळ अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांतील परीक्षा उपकेंद्रांवरच प्रवेश देण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी न दवडता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.