‘काम करत शिक्षण घ्यायचे आहे’, ‘खासगी कॉलेजचे शुल्क परवडत नाही’, ‘दर्जेदार पदवी हवी; पण वेळ नाही’ अशा हजारो विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या Center for Distance and Online Education (CDOE) तर्फे पहिल्यांदाच जानेवारी सत्रासाठी MBA, MCA, MCom आणि MA अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जुलै सत्रात प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन तसेच डिस्टन्स पद्धतीने पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

या अभ्यासक्रमांचे कमी शुल्क, दर्जेदार शिक्षण आणि करिअरला दिशा देणारे प्लेसमेंट मार्गदर्शन ही तीन मोठी वैशिष्ट्ये आहेत. MBA आणि MCA हे अभ्यासक्रम पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबवले जाणार असून, विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांचे व्हिडिओ लेक्चर्स, डिजिटल अभ्यास साहित्य, LMS आधारित शिक्षण प्रणाली, ऑनलाइन मूल्यांकन व परीक्षा यांसारख्या सुविधा मिळणार आहेत. या पदव्या नोकरी, पदोन्नती तसेच स्पर्धा परीक्षांसाठी पूर्णतः वैध असून, MBA अभ्यासक्रम डिस्टन्स लर्निंग पद्धतीनेही उपलब्ध आहे.
खासगी व अभिमत विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठाचे शुल्क अत्यंत माफक असल्याने आर्थिक कारणांमुळे पदव्युत्तर शिक्षणापासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त पदवी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. ऑनलाइन व डिस्टन्स शिक्षण असूनही विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास उपक्रम आणि प्लेसमेंटसाठी सहाय्य दिले जाणार असल्यामुळे पदवी पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संधी अधिक सुलभ होणार आहेत.
कोणासाठी उपयुक्त?
- आयटी कंपन्या व उद्योगांमधील कर्मचारी
- स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी
- गृहिणी तसेच ग्रामीण व दूरस्थ भागातील विद्यार्थी
- एकाच वेळी दोन पदव्या शिकण्याची इच्छा असणारे विद्यार्थी
उद्योगाभिमुख अभ्यासक्रम
MBA मध्ये व्यवस्थापन, फायनान्स, मार्केटिंग, HR यांसारख्या करिअर-उपयोगी विषयांवर भर देण्यात आला आहे. MCA मध्ये प्रोग्रामिंग, डेटा मॅनेजमेंट, वेब व आधुनिक संगणक तंत्रज्ञान, तर MCom अभ्यासक्रमाची रचना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार करण्यात आली असून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढणार आहे. MA अभ्यासक्रमांत एज्युकेशन, इंग्रजी, मराठी, संस्कृत, हिंदी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांचा समावेश आहे.
येत्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू
जानेवारी सत्रासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया येत्या आठवड्यात सुरू होणार असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी https://cdoe.sppuef.in/Home या पुणे विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्वरित अर्ज करावा, असे आवाहन संचालक डॉ. वैभव जाधव यांनी केले आहे.

Comments are closed.