पुणे जिल्ह्यातील शालेय कुस्ती स्पर्धांदरम्यान मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांचे वय कमी दाखवण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्रांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून, शिक्षण विभागाने अशा शाळा आणि विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.
सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दि. १९ व २० सप्टेंबर २०२५ रोजी बापूसाहेब आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, निमगाव केतकी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे पार पडली. या स्पर्धेदरम्यान कु. आर्यन विक्रम दाभाडे (१७ वर्षाखालील ग्रीको रोमन प्रकार, वजनगट ७१ कि.ग्रॅ.), सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल, तळेगाव दाभाडे यांनी तक्रार दाखल केली होती की कु. माऊली राजेंद्र कचरे, इयत्ता १० वी, माध्यमिक विद्यालय खोरोची, ता. इंदापूर यांनी खोटे जन्म प्रमाणपत्र सादर केले आहे.
चौकशीत ग्रामपंचायत वरूड, ता. भूम, जि. धाराशिव यांनी दिलेल्या अहवालात माऊली कचरे यांनी सादर केलेली जन्मनोंद चुकीची असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार त्या खेळाडूला स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले असून, तक्रारदार आर्यन दाभाडे यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी पात्र घोषित करण्यात आले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि उपसंचालक (क्रीडा व युवक सेवा), पुणे विभाग यांच्या सूचनेनुसार, वय निश्चितीसाठी बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या विद्यार्थी व शाळांविरुद्ध तातडीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात १० ऑक्टोबर २०२५ रोजी येरवडा पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार नोंदविण्यात आली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले की शासनाचा उद्देश खेळातील प्रामाणिकता, पारदर्शकता आणि नैतिकता जपणे हा आहे. त्यामुळे यापुढे अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली जाणार असून, शालेय क्रीडा स्पर्धांमधील विश्वासार्हता आणि नीतिमत्ता अबाधित ठेवण्याचा निर्धार विभागाने व्यक्त केला आहे.

Comments are closed.