शेतात काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे राज्यात अनेक शेतकऱ्यांना जीव गमावावा लागतो किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येते. अशा कठीण प्रसंगी शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी राबवण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन घेता येणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. यापूर्वी ऑफलाइन असलेली संपूर्ण अर्जप्रक्रिया आता डिजिटल करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासन 19 एप्रिल 2023 पासून ही योजना राबवत असून, अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात येते. पूर्वी योजना लाभासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. मात्र, आता महाडीबीटी पोर्टलवरून घरबसल्या अर्ज करता येणार असून, अर्जाची सद्यस्थितीही ऑनलाईन पाहता येणार आहे.
महाडीबीटीवर अर्ज भरताच तो थेट कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास, संबंधित शेतकरी किंवा वारसदारांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाणार असून, त्या त्रुटी ऑनलाईनच दुरुस्त करता येतील. त्यामुळे वेळेची बचत होणार असून शासकीय कार्यालयांवरील ताणही कमी होईल.
या योजनेसाठी सन 2025-26 मध्ये 120 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत 4359 शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर होऊन 88.19 कोटी रुपये थेट डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. महाडीबीटी पोर्टलमुळे योजना अधिक वेगवान, पारदर्शक आणि शेतकरी-केंद्रित होणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.