बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादींच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत स्पष्ट केलं की, आधार कार्ड नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा म्हणून स्वीकारला जाऊ शकत नाही.

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेला मान्यता देत सांगितलं की, नागरिकत्वाची खात्री करण्यासाठी आधाराशिवाय स्वतंत्र पडताळणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे, आधार असला तरी, मतदार म्हणून नोंदणीसाठी अतिरिक्त दस्तऐवज व तपासणी अपेक्षित असेल.
ही सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर झाली. सुनावणीदरम्यान, वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेमुळे अनेक मतदारांना अन्यायकारकपणे वगळण्यात येईल. विशेषतः ज्यांना आवश्यक फॉर्म वेळेत भरता आले नाहीत, त्यांची नावे यादीतून काढली जातील.
सिब्बल यांनी पुढे दावा केला की, २००३ च्या मतदार यादीत नाव असणाऱ्यांनाही आता पुन्हा फॉर्म भरावा लागेल. अन्यथा, त्यांचे नाव कोणताही बदल न होता यादीतून वगळले जाईल. यामुळे लाखो मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतील, असा त्यांचा इशारा होता.
त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार ७.२४ कोटी अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, मृत्यू किंवा स्थलांतराची पुरेशी चौकशी न करता जवळपास ६५ लाख नावे थेट वगळण्यात आली आहेत. या निर्णयामुळे व्यापक पातळीवर मतदारांचे नुकसान होऊ शकते, असं ते म्हणाले.
खंडपीठाने या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करत विचारलं की, “६५ लाखांचा हा आकडा कसा ठरवला गेला?” तसेच, “तुमची भीती काल्पनिक आहे की प्रत्यक्षात घडणारी आहे, हे आम्हाला समजून घ्यायचं आहे,” अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.
यासोबतच, न्यायालयाने स्पष्ट केलं की, निवडणूक आयोगाकडे पडताळणी करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर त्यांच्याकडे अधिकार नसेल, तर ही प्रक्रिया थांबू शकते; मात्र अधिकार असल्यास, मतदारांची पडताळणी विनाअडथळा पुढे जाऊ शकते.
हा निर्णय केवळ बिहारपुरता मर्यादित नसून, देशभरातील मतदार नोंदणी प्रक्रियेवर परिणाम करू शकतो. नागरिकत्वाचा पुरावा म्हणून केवळ आधार न स्वीकारण्याची भूमिका, भविष्यातील निवडणुका आणि मतदार यादींची पारदर्शकता यासाठी निर्णायक ठरू शकते.

Comments are closed.