एएसी कला शिक्षण सीईटी नोंदणीला मुदतवाढ; १३ मार्चपर्यंत अर्जाची संधी! | AAC Art CET Registration Till March 13!

AAC Art CET Registration Till March 13!

राज्यातील कला पदवी अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी एएसी-कला शिक्षण सीईटी नोंदणी प्रक्रिया आता १३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी) इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा देत अर्जाची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत २,४०५ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

AAC Art CET Registration Till March 13!

रेखांकन व रंगकला (पेंटिंग), शिल्पकला (स्कल्प्चर), वस्त्रकला (टेक्सटाइल डिझाइन), मातीकाम (सिरॅमिक्स), गृहसजावट (इंटिरियर डिझाइन), धातूकला (मेटल वर्क) आणि उपयोजित कला (अप्लाइड आर्ट) अशा सात प्रमुख अभ्यासक्रमांसाठी ही सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील कला महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांना अर्जासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठीच मुदतवाढ देण्यात आल्याचे कक्षाने स्पष्ट केले आहे.

यंदा नोंदणीचा वेग मागील वर्षांच्या तुलनेत काहीसा मंदावलेला दिसत आहे. २०२३-२४ मध्ये ३,४६०, २०२४-२५ मध्ये ३,१८१, तर २०२५-२६ मध्ये २,७८९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी सोमवारपर्यंत २,४०५ अर्जच प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे, यासाठी अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.

ही प्रवेश परीक्षा १० एप्रिल रोजी राज्यातील विविध केंद्रांवर संगणकाधारित ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. अर्ज प्रक्रिया, सविस्तर वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाउंट रजिस्ट्री’ (APAR) आयडी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘युनिक डिसअॅबिलिटी आयडी’ नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. हे आयडी उपयुक्त असले तरी बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. डिजिलॉकरच्या माध्यमातून APAR आयडी तयार करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Comments are closed.