राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाला अतिरिक्त ९६५ पदांची मंजुरी मिळाल्याने विभागाला मोठा बूस्टर मिळणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक वेगवान आणि सुलभ होतील, असा विश्वास विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. सुधारित आकृतीबंधाला सरकारची मान्यता मिळाल्यानंतर आता पदोन्नती आणि थेट भरती प्रक्रियेला गती आली आहे.

विभागाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह नवीन भरतीसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या असून, येत्या महिनाभरात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुधारित आकृतीबंधानुसार सेवा ज्येष्ठतेच्या आधारे किती पदे उपलब्ध होतील, कोणाला पदोन्नती देता येईल आणि पदोन्नतीनंतर किती जागा रिक्त राहतील, यानुसार नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
या प्रक्रियेत तीन नोंदणी उपमहानिरीक्षक पदांवर विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नतीद्वारे संधी देण्यात येणार आहे. तसेच दुय्यम निबंधक पदासाठी कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांमधून पात्र उमेदवारांची निवड करण्याचा विचार सुरू आहे. दुय्यम निबंधक हे जबाबदारीचे पद असल्याने, पात्रता व अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांनाच संधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या महिनाअखेरीस पदभरती व नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागाने काही महिन्यांपूर्वी विभागाची फेररचना करून नव्या पदनिर्मितीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. त्या प्रस्तावाला मान्यता देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागाला गती देण्याचा निर्णय घेतला. परिणामी, आता राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागात एकूण पदसंख्या ३,९५२ इतकी झाली आहे.
या अतिरिक्त पदांमध्ये तीन नोंदणी उपमहानिरीक्षक, ८० दुय्यम निबंधक पदे तसेच ६०० हून अधिक वरिष्ठ व कनिष्ठ लिपिकांची पदे उपलब्ध होणार आहेत. याशिवाय मुद्रांक अधीक्षक, सहाय्यक जिल्हा निबंधक वर्ग-२, दुय्यम निबंधक वर्ग-२, उपसंचालक नगररचना, उपअधीक्षक, सहाय्यक नगररचनाकार अशा ४७ विविध प्रकारच्या पदनिर्मितींना सरकारची मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे विभागातील कामकाजाला मोठी चालना मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Comments are closed.