केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ८वा वेतन आयोग आता अधिकृतपणे स्थापन करण्यात आला असून त्याची अधिसूचना देखील प्रसिद्ध झाली आहे.
या आयोगामार्फत सध्याच्या वेतनरचना, भत्ते आणि सुविधा यांचा संपूर्ण आढावा घेण्यात येणार आहे. आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
अनेक कर्मचारी चर्चा करत असलेला प्रश्न म्हणजे—पगार आणि पेन्शन पुढच्या महिन्यात वाढणार का? सोशल मीडियावरील चर्चांमुळे गोंधळ आणखी वाढला आहे. काही जण जानेवारीपासूनच वाढीव रक्कम मिळेल असे म्हणत आहेत तर काही DA बंद होणार या अफवा पसरवत आहेत.
तथापि तज्ञांच्या मते, सरकारने आयोगाच्या शिफारसी मान्य केल्यास नवीन वेतनरचना १ जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकते. पण लागू होणं म्हणजे लगेच पगार खात्यात येईलच असं नाही. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि कॅबिनेट मान्यतेनंतरच प्रत्यक्ष पैसे मिळतील. मात्र, विलंबाच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना मोठ्या अरिअर्सचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
DA आणि HRA बंद होणार या अफवांना सरकारने पूर्णविराम दिला आहे. कोणताही भत्ता बंद करण्याचा किंवा DA बेसिकमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव नाही. DA आणि DR पूर्वीप्रमाणेच महागाईच्या निर्देशांकानुसार दर सहा महिन्यांनी वाढत राहणार आहेत.
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा—वेतन किती वाढणार?
आयोगातील ‘फिटमेंट फॅक्टर’ यावर वाढ अवलंबून असते. ७व्या वेतन आयोगात हा फारक 2.57 होता. यावेळी तो 2.86 किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हे खरे ठरले, तर कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात ३०% ते ३४% पर्यंत वाढ दिसू शकते. नवीन DA जोडल्यावर एकूण वेतनात मोठी भर पडणार आहे.

Comments are closed.